भद्रावती प्रतिनिधी/जावेद शेख :-
भद्रावती पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत एका तरुणाला गांजासह अटक केली. या कारवाईत ९०७ ग्रॅम गांजा तसेच मोबाईल आणि दुचाकीसह एकूण ₹१,०३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.Shocking! Sale of cannabis from a house in Bhadravati; 907 grams of cannabis, worth ₹1.03 lakh seized
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जुलै २०२६ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, शिवाजी नगर, नाग मंदिरामागे राहणारा सोनल दशरथ महाकुळकर (वय २०) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करीत आहे.
या माहितीची खातरजमा करून पंचांसमक्ष आरोपीच्या घराची व अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या हिरो होंडा सीडी डिलक्स (एमएच-३१-व्हीएस-९०६३) या दुचाकीच्या हँडलला लावलेल्या पिशवीत ९०७ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गांजा, एक जुना सॅमसंग मोबाईल आणि दुचाकी असा ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा क्रमांक ६८५/२०२६ अंतर्गत NDPS कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली.
0 comments:
Post a Comment