चंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी नवनवीन प्रयत्न सातत्याने केले जातात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रेरणेतून ‘झेडपी चांदा स्टुडन्ट अॅप’ (ZP CHANDA STUDENT APP) तयार करण्यात आले आहे. लवकरच हे ॲप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.'ZP Chanda Student App' In the hands of ZP school students
चंद्रपूर जिल्हा परिषदेने शाळांशी संबंधित सर्व माहितीसाठी ‘चांदा स्टुडंट्स’ हे वेबपोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. या पोर्टलवर शाळा व विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध असेल. ही प्रणाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शाळा शिक्षक आणि पालकांसाठी तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये स्वयंसेवी संस्थांना देखील नोंदणी करता येईल व विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये जिल्हा प्रशासनाला सहकार्य करता येईल.
ॲपमध्ये समाविष्ट बाबी : या ॲपद्वारे शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाची माहिती उपलब्ध होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान हा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया आहे. याबद्दलची माहिती एकत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणाची विश्लेषणात्मक माहिती या पोर्टलवर उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारे अध्ययन स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यास मदत होईल.
या प्रणालीमध्ये विद्यार्थीनिहाय रिपोर्ट कार्डची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून शाळेतील शिक्षक, पालक सभा घेतील. तसेच पालक त्यांच्या पाल्याच्या सर्वांगीण गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध शालेय व सहशालेय उपक्रमात सहभाग घेऊ शकतील. याशिवाय प्रणालीमध्ये विविध प्रशासकीय बाबीनुसार अहवाल उपलब्ध आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर आढावा बैठकांसाठी या अहवालांचा उपयोग केला जाईल.
शिष्यवृत्ती, नवोदय, महाराष्ट्र टॅलेंट सर्च यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी व चांगल्या निकालासाठी अभ्यास साहित्य आणि चाचणी परीक्षा देणे अतिशय महत्त्वाचे असते. या प्रणालीद्वारे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने तयार केलेले अभ्यास साहित्य आणि चाचणी परीक्षा शाळास्तरावर उपलब्ध करून देता येतील. यासोबतच या चाचणी परीक्षांचे विद्यार्थीनिहाय मूल्यांकन सुद्धा बघता येईल.
झेडपी चांदा स्टुडन्ट ॲपचे वैशिष्ट :
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म: शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व 21 व्या शतकातील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध शाळाबाह्य उपक्रम चालू असतात. या उपक्रमांचे फोटो व व्हिडिओ इतरांसहित शेअर करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे हेल्थ प्रोफाइल : या ॲपमध्ये शैक्षणिक प्रोफाइल उपलब्ध असेलच पण यासोबत आरोग्य विभागामार्फत शाळास्तरावर होणाऱ्या विविध सर्वेक्षणाची माहिती या हेल्थ प्रोफाइलमध्ये उपलब्ध असेल.
पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप : झेडपी चांदा स्टुडन्ट अॅपचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करण्यासाठी हे ॲप अतिशय मोलाचे ठरणार असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले होते.
झेडपी चांदा स्टुडन्ट अॅप तयार करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांचे सहकार्य लाभले आहे
0 comments:
Post a Comment