मुंबई :राज्य सरकारने 'महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमी ' स्थापना केली असून त्याबद्दल फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ने नुकतेच मंत्रालयात भेट घेत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. तेलगू फेडरेशनचे अध्यक्ष जगनबाबू गंजी यांनी सांगितले की ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या तेलगू साहित्य अकादमीमुळे राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या तेलगू भाषिकांना एक हक्काचे साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. राज्यात या आधी पासूनच हिंदी, सिंधी आणि गुजराती या तीन भाषिक साहित्य अकादमी कार्यरत आहेत. त्यात आता तेलगू आणि बंगाली साहित्य अकादमीची भर पडली आहे.
Telugu Federation thanks Min. Mungantivar for establishing Maharashtra Telugu Sahitya Akademi
तेलगू अकादमीच्या स्थापनेत पुढाकार घेतल्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार फेडेरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (एफ-टॉम) ने नुकताच मंत्रालयात केला. यावेळी अध्यक्ष जगनबाबू गंजी यांच्यासोबत प्रधान सरचिटणीस अशोक कांटे, संगेवानी रवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तेलगू आणि मराठी या भाषा भगिनी आहेत, महाराष्ट्राच्या जडणघडणीत तेलगू भाषकांचाही मोठा वाटा आहे, असे सांगितले. तेलुगू मराठी भाषेचे सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक आहेत, असे सांगून ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू तंजावरचे राजे सरफोजीराजे भोसले यांनी तेलगूतूनही अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या आहेत, याकडे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश या शेजारच्या राज्यात असलेल्या साहित्य परिषदेसारख्या संस्थांसोबत, तेलुगु आणि मराठी भाषिकांच्या विचारांची देवाण घेवाण करण्यात ही नवीन तेलगु अकादमी सहाय्यभूत ठरेल.
एफ-टॉम चे अध्यक्ष श्री जगनबाबू गंजी यावेळी म्हणाले की तेलगू भाषक समाजाचे मुंबईच्या उभारणीत, उद्योगधंद्यात, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे. मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक इमारती तेलुगु भाषिकांनी उभारल्या आहेत. या संदर्भात मनोहर कदम यांच्या पुस्तकात नोंदी नमूद आहेत. सामाजिक चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक तेलुगु भाषिक शहीद झाले आहेत, असे ते म्हणाले. बालगंधर्वांची अनेक नाटके तेलुगु भाषेत भाषांतरीत करून सादरही झाली आहेत, अशी ही माहिती त्यांनी दिली. तेलगु अकादमीच्या स्थापनेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचेही आभार मानले आहेत.
नवीन तेलगू साहित्य अकादमी वर लवकरच अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
0 comments:
Post a Comment